‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात माजी प्राध्यापक; दापोलीत १.२३ कोटींची सायबर फसवणूक उघड
कोकणात *‘डिजिटल अरेस्ट’*च्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीचा आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यात समोर आला आहे. स्वतःला पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी दापोलीतील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला मानसिक दबावाखाली ठेवत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी हे या सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आकाश शर्मा, शिवप्रकाश आणि दया नायक अशी संशयितांची नावे असून, ४ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ही फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
संशयितांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून स्वतःला बेंगळुरू पोलीस आणि नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. जोशी यांच्या नावाने मुंबईतील माटुंगा येथे कॅनरा बँकेत खाते असल्याचा बनाव रचत, त्या खात्यातून ३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात ५० लाख रुपयांचा दंड भरण्याची धमकी देत, अन्यथा ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येईल, असे सांगून त्यांना सातत्याने मानसिक तणावाखाली ठेवण्यात आले.
कथित कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संशयितांच्या सांगण्यानुसार डॉ. जोशी यांनी ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग केली. या कालावधीत एकूण १ कोटी २३ लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा करण्यात आले.
नंतर संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटू लागल्यानंतर आणि संबंधित यंत्रणांकडून खातरजमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे डॉ. जोशी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संशयितांनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. फसवणूक केलेली रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, याचा मागोवा घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.
या घटनेमुळे दापोलीसह संपूर्ण कोकण परिसरात खळबळ उडाली असून, ‘डिजिटल अरेस्ट’, ‘सीबीआय चौकशी’ किंवा ‘बँक खात्यातील गैरव्यवहार’ अशा नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे वाढते जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा संशयास्पद फोन कॉल्सवर विश्वास न ठेवता तात्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


