डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन
डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन
आष्टा (सांगली) | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाळवा तालुक्यातील आष्टा येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे अभिष्टचिंतन, ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे कार्य गौरवत त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ‘भीष्म पितामह’ अशी उपमा दिली. धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनतेशी असलेली बांधिलकी हे त्यांचे विशेष गुण असल्याचे त्यांनी सांगितले.
तळागाळातील जनतेचे प्रश्न सखोल अभ्यास आणि प्रभावी प्रशासकीय पकडीच्या माध्यमातून सोडविण्यात डॉ. डांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याच्या कार्याचे मोठे श्रेय त्यांना जाते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे तसेच सत्कारमूर्ती डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.
शैक्षणिक संकुलातील नव्या सुविधा आणि अत्याधुनिक वास्तूंमुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.