तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!

0
5
तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!
तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!

तळकोकणातील लोककलाविष्काराने कणकवलीत रंगली देवदिवाळीची सांस्कृतिक मेजवानी!

३० कलाकारांच्या सहभागातून दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण; आमदार प्रमोद जठार यांच्याकडून कलाकारांचे कौतुक

कणकवली :
देवदिवाळीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी ईली फराळाक येवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाला. तळकोकणातील समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देखणा आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळाला.

कोकणच्या मातीत रुजलेली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारी दशावतार लोककला या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. तब्बल ३० कलाकारांनी आपल्या अभिनयातून, प्रभावी संवादफेकीतून आणि पारंपरिक कलाविष्कारातून दशावतार कलेचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमातून कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.

या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि कलाकारांना खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून लोककलांच्या संवर्धनासाठी आणि कलाकारांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कोकणची ओळख असलेल्या दशावतारासारख्या लोककलांना प्रोत्साहन मिळणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी स्टार दिगंबर नाईक आणि श्रुती परब यांनी आपल्या खास मालवणी शैलीत केले. त्यांच्या खुमासदार निवेदनामुळे कार्यक्रमाला कोकणी बाज आणि विशेष रंगत प्राप्त झाली.
यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. देवदिवाळीच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यामुळे कणकवलीत कोकणच्या लोककलेचा, परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा जागर घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here