तारापूर एमआयडीसीत ऑलियम गॅस गळती; परिसरात घबराट
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या डी झोनमधील भागेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनिट केमिकल्स) येथील प्लॉट क्रमांक डी-१७ येथे ऑलियम गॅस गळती झाल्याची घटना घडली. ही गळती दुपारी सुमारे २.०० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान सुरू झाली असून त्यामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने हवेच्या संपर्कात आल्यानंतर ऑलियमचे रूपांतर सल्फर डायऑक्साइड आणि इतर सल्फर ऑक्साईडमध्ये झाले. यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागला.
या वायूच्या परिणामामुळे अनेकांनी डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, कोरडेपणा तसेच घसा खवखवण्याच्या तक्रारी केल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वायूचा परिणाम सुमारे एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात जाणवला.


