तुर्भेतील साधना एंटरप्रायझेसवर FDA आणि गुन्हे शाखेची धाड; ५.७५ कोटींचा खाद्यसाठा जप्त

0
7
तुर्भेतील साधना एंटरप्रायझेसवर FDA आणि गुन्हे शाखेची धाड
तुर्भेतील साधना एंटरप्रायझेसवर FDA आणि गुन्हे शाखेची धाड

तुर्भेतील साधना एंटरप्रायझेसवर FDA आणि गुन्हे शाखेची धाड; ५.७५ कोटींचा खाद्यसाठा जप्त

मुदत संपण्याच्या तारखेत फेरफार केल्याचा आरोप; ४,१४२ कार्टन जप्त, अन्न परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू

नवी मुंबई :
तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील साधना एंटरप्रायझेसवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली. पॅकेजिंगवरील उत्पादन व मुदत संपण्याची अथवा वापरण्याची तारीख खोडून त्याजागी नवीन तारीख टाकल्याचा प्रकार तपासात आढळून आल्याने अंदाजे ५ कोटी ७५ लाख रुपये किमतीचे ४,१४२ खाद्यपदार्थांचे कार्टन जप्त करण्यात आले.
२४ ते २९ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत साधना एंटरप्रायझेस येथे विविध निर्यात कंपन्यांकडून आलेल्या खाद्यपदार्थांचा साठा करून त्यांची पुनर्पॅकिंग व लेबलिंग करताना फेरफार केल्याचे आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादनाची तारीख तसेच मुदत संपण्याची किंवा वापरण्याची तारीख बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय घटकद्रव्ये आणि पौष्टिक मूल्यांची माहिती असलेल्या स्टिकर्समध्येही फेरफार करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये लेज, कुरकुरे, बिंगो, फन फ्लिप्स, मॅगी, रसोई, नॉर, हेलमन्स, थम्स अप आणि लिम्का यांसारख्या विविध ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे. ‘रसोई’ ब्रँडच्या अमृतसरी पनीर टिक्का मसाला, दम आलू आणि दाल मखनी या तयार खाद्यपदार्थांसह थम्स अप व लिम्काची कॅन्स आणि हेलमन्स मेयोनीजचाही साठा जप्त करण्यात आला.
सहआयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साठा देशांतर्गत वापरासाठी तसेच परदेशात निर्यात करण्यासाठी संबंधित कंपन्यांमार्फत आणण्यात आला होता. हा साठा १० कंपन्यांशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईत ३०,६०० रुपये किमतीचे अतिरिक्त लेबल नसलेले आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले. पॅकेजिंगची नक्कल करण्यासाठी प्रिंटिंग मशीन व कन्व्हेयर यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSSAI Act), २००६ आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच साधना एंटरप्रायझेसचा अन्न परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here