दक्षिण ध्रुवावर इतिहास रचणाऱ्या काम्या कार्तिकेयन यांचा भारतीय नौदलाकडून गौरव
भारतीय नौदलाने नौदल अधिकाऱ्याची १८ वर्षीय कन्या आणि नेव्ही चिल्ड्रन्स स्कूल (NCS) ची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिचे अभिनंदन केले आहे. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी ती सर्वात तरुण भारतीय तर जगातील दुसरी सर्वात तरुण महिला ठरली असून, या कामगिरीने तिने पुन्हा एकदा देशाचा अभिमान उंचावला आहे.
अंटार्क्टिकातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत काम्याने ही अवघड मोहीम यशस्वी केली. उणे ३० अंश सेल्सिअस इतक्या तीव्र थंडीत, वेगवान वादळी वाऱ्यांमध्ये आणि पूर्ण मोहिमेचे साहित्य भरलेली स्लेज स्वतः ओढत तिने ८९ अंश दक्षिण अक्षांशापासून पायी प्रवास सुरू केला. सुमारे ६० नॉटिकल मैल, म्हणजेच जवळपास ११५ किलोमीटरचे अंतर तिने अथक परिश्रमाने पार केले आणि २७ डिसेंबर २०२५ रोजी दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे ध्वज रोवला.
लहान वयातच गिर्यारोहण आणि साहसी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी काम्या सध्या ‘एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. सातही खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणे आणि उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांवर स्कीइंग करणे अशी ही अत्यंत आव्हानात्मक मोहीम असून, ती पूर्ण करणारी आतापर्यंतची सर्वात तरुण व्यक्ती होण्याचे स्वप्न काम्या साकार करत आहे. तिच्या या धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासामुळे देशातील तरुणांसाठी नवे आदर्श निर्माण झाले आहेत.


