औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मात्र या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात याव्या यासाठी आज महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणावर आक्रमक होत ही मागणी लावून धरली.
औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनांनी एकत्रित शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर शाळा महाविद्यालय आता कुठे सुरू झाले आहेत. त्यातच ऑफलाइन पद्धतीने परीक्षानिर्णय घेण्यात येणार असल्याने शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले. यावर्षीच्या परिक्षा पुढे ढकला किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नांदेडमध्येही विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोणतीही परवानगी न घेता नांदेडमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध केला.


