दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार; ३ पदांना मंजुरी

0
29
दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार; ३ पदांना मंजुरी
दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार; ३ पदांना मंजुरी
दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार; ३ पदांना मंजुरी

दापोली, खेड व मंडणगड तालुक्यांसाठी स्वतंत्र कार्यालय; रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय

दापोली :
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने दापोली येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे. या नवीन कार्यालयासाठी तीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांचे प्रशासकीय कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर (देवरुख), लांजा आणि राजापूर असे एकूण सहा तालुके राहणार आहेत.
तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय, दापोली यांच्या कार्यक्षेत्रात दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांशी संबंधित महसूल व प्रशासकीय कामकाजासाठी दापोली येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकारी रत्नागिरी अधिकारी म्हणून काम पाहणार
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी तसेच नव्याने स्थापन होणारे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, दापोली या दोन्ही कार्यालयांचे अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रत्नागिरी काम पाहणार आहेत. तर नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांची जबाबदारी राहणार आहे.
सुरुवातीला हे नवीन कार्यालय तात्पुरत्या स्वरूपातील जागेत सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर कायमस्वरूपी जागेचा शोध घेऊन नवीन कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
दापोली येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यामुळे दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here