दापोली तालुक्याचा अभिमान! इनाम पांगारीचा सुपुत्र सुहास दिवाळे बनला भारत सरकारच्या NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी

0
36
सुहास दिवाळे बनला भारत सरकारच्या NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी
सुहास दिवाळे बनला भारत सरकारच्या NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी

दापोली तालुक्याचा अभिमान! इनाम पांगारीचा सुपुत्र सुहास दिवाळे बनला भारत सरकारच्या NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने गाठले यशाचे सर्वोच्च शिखर

दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
“मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरात जन्म घ्यावा लागत नाही; ती पूर्ण करण्यासाठी मोठी जिद्द, सातत्य आणि अथक परिश्रम आवश्यक असतात,” या विचाराचे जिवंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील इनाम पांगारी गावचा सुपुत्र सुहास सुनिल दिवाळे. भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) म्हणून त्याची निवड झाली असून, ही दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
देशभरातील तब्बल १,४४० गुणवंत उमेदवारांमधून अंतिम १२० जणांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सुहास दिवाळे याने मानाचे स्थान मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणारे आहे.
सुहासचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनाम पांगारी येथे झाले. त्यानंतर त्याने विश्राम रामजी घोले हायस्कूल, वाकवली, माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा, निवे-बुद्रुक, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी तसेच श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खेड येथे शिक्षण पूर्ण केले. बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून २०१९ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम क्रमांकाने पूर्ण करून त्याने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली.
इंजिनिअरिंगनंतर त्याने स्पर्धा परीक्षांची वाट निवडली. अत्यंत कठीण समजली जाणारी GATE परीक्षा तीन वेळा उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण होत त्याने आपल्या क्षमतेचा ठसा उमटवला. ISRO, BARC, HPCL, IOCL, DRDO, RRB-JE, BMC अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या भरती प्रक्रियेत तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. अनेकदा यश हुलकावणी देत राहिले, मात्र त्याने कधीही हार मानली नाही. २०२५ मध्ये IIT मुंबई येथे एम.टेक. शिक्षण सुरू असतानाच त्याची NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्याच्या चिकाटीला यशाचे सुवर्णफळ मिळाले.
अभ्यासाबरोबरच सुहास हा उत्कृष्ट क्रिकेटपटूही आहे. क्रिकेटमधून मिळालेली शिस्त, नेतृत्व, संघभावना आणि संयम या गुणांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक बळ दिले. इनाम पांगारी क्रिकेट संघाच्या यशातही त्याचे मोठे योगदान राहिले आहे.
या यशामागे त्याचे आई-वडील सुनिल दिवाळे आणि शुभ्रदा दिवाळे यांचे मोलाचे योगदान आहे. आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी सातत्याने त्याग केला, प्रोत्साहन दिले आणि त्याच्यावर अढळ विश्वास ठेवला. त्यांच्या कष्टांचे आणि संस्कारांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सुहास दिवाळे याची ही यशोगाथा केवळ एका व्यक्तीची उपलब्धी नसून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारी आहे.
“यश नशिबाने मिळत नाही; ते सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावर मिळते,” हे सुहास दिवाळे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.
दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि इनाम पांगारी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या सुहास सुनिल दिवाळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी वैज्ञानिक कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here