तुटलेल्या वीजवाहिनीचा करंट; दोन गाभण गाईंचा जागीच मृत्यू
दापोली ब्रेकिंग – तुटलेल्या वीजवाहिनीचा करंट; दोन गाभण गाईंचा जागीच मृत्यू
महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप
दापोली | प्रतिनिधी -अरविंद अनंत मांडवकर
दापोली तालुक्यातील मौजे पिसई येथील स्मशानभूमी परिसरात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २८) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी नारायण भिकू मोरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तुटलेल्या वीजवाहिनीचा करंट; दोन गाभण गाईंचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मोरे हे आपल्या गाई स्मशानभूमी परिसरात चरावयास घेऊन गेले होते. यावेळी परिसरातून जाणाऱ्या तीन-फेज वीजवाहिनीतील एक विद्युतवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली होती. चरत पुढे गेलेल्या दोन जर्सी हायब्रीड क्रॉस जातीच्या गाभण गाईंना त्या विद्युतवाहीनीचा स्पर्श होताच जोरदार विद्युतप्रवाहाचा धक्का बसला आणि दोन्ही गाईंचा जागीच मृत्यू झाला.
गाई मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज ऐकून नारायण मोरे घटनास्थळी धावले. मात्र, त्यांना खाली पडलेली वीजवाहिनी दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखून गाईंना स्पर्श केला नाही. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर अजित एसरे यांनी तात्काळ डीपीवरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.
मृत झालेल्या दोन्ही गाई गाभण असून त्यांची एकूण अंदाजे किंमत ₹८०,००० इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मोरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, महावितरणचे वायरमन, संबंधित अधिकारी, तलाठी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तलाठ्यांनी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय तपासणीनंतर मृत जनावरे मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांची वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळे निष्पाप जनावरांचा बळी गेला असून भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच बाधित शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.