दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मोफत अन्नसेवेची व्यवस्था
दुबई : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रासह भारतातील अनेक नागरिक आणि पर्यटकांना दिलासा देणारी पुढाकाराची बातमी समोर आली आहे. दुबईतील करामा परिसरातील मुंबई एक्सप्रेस रेस्टॉरंट आणि कॅफे येथे अडकलेल्या भारतीयांसाठी मोफत अन्नसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र व भारतातील सर्व नागरिक तसेच पर्यटकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत करण्याच्या हेतूने हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या सुविधेमुळे दुबईमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून गरजू भारतीयांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दुबईतील भारतीय समुदायाकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
अडचणीच्या काळात परदेशातही भारतीयांनी एकमेकांना दिलेला हा मदतीचा हात सामाजिक एकतेचे उदाहरण ठरत आहे.


