दुबई–अअबुधाबीमध्ये पहिल्यांदाच गाजणार मराठी लोककलेचा जल्लोष; ‘The Folk आख्यान’चे शानदार सादरीकरण
दुबई/अअबुधाबी :
महाराष्ट्राच्या लोकसंगीताची समृद्ध परंपरा, लोककथांचा खजिना आणि लोकनाट्याची रसरशीत मांडणी घेऊन ‘The Folk आख्यान’ हा उपक्रम आता सातासमुद्रापार पोहोचत आहे. प्रथमच दुबई आणि अबुधाबीमध्ये या अनोख्या मराठी लोकसंगीत व लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन होणार असून परदेशातील मराठी बांधवांसाठी ही उत्साहवर्धक सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
‘The Folk आख्यान’ हा एक थेट (live) मराठी लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम असून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण लोककलांचा उत्सव साजरा करणारा हा प्रकल्प प्रेक्षकांना कथा, संगीत, नृत्य आणि सादरीकरण यांच्या अनोख्या संगमातून अविस्मरणीय अनुभव देतो.
या कार्यक्रमाचे विविध भाग सुप्रसिद्ध सादरीकरणकर्ते Harsh-Vijay यांच्या दमदार आणि भावपूर्ण प्रस्तुतीने सजले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी—विशेषतः पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच आणि मुंबईतील प्रतिष्ठित सांस्कृतिक स्थळांवर—या कार्यक्रमाने अभूतपूर्व प्रतिसाद मिळवला आहे. याच उत्साहावर स्वार होत आता हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :
-
महाराष्ट्राच्या लोककलेचे आधुनिक सादरीकरण
-
लोकसंगीत, लोककथांचे कथन, नृत्य आणि नाट्य यांचा प्रभावी मिलाफ
-
Harsh-Vijay यांची ऊर्जा, संगीताची जाण आणि रंजक कथाकथन शैली
-
सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावणारा मनोरंजक प्रवास
दुबई आणि अबुधाबीमधील मराठी समुदायासाठी हा कार्यक्रम मातृभाषेचा, मातृसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या सुप्त सांस्कृतिक मातीचा सुगंध अनुभवण्याची बहुमोल संधी ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या तारखा व स्थळांची माहिती लवकरच आयोजकांकडून जाहीर करण्यात येणार आहे. मराठी कला आणि संस्कृतीचे सौंदर्य जगभर पोहोचवणाऱ्या या उपक्रमाबद्दल मराठी रसिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.


