दुर्गवीर प्रतिष्ठानची किल्ले रामगड मोहिम श्रमदान मोहीम

0
19
दुर्गवीर प्रतिष्ठानची किल्ले रामगड मोहिम श्रमदान मोहीम
दुर्गवीर प्रतिष्ठानची किल्ले रामगड मोहिम श्रमदान मोहीम

दुर्गवीर प्रतिष्ठानची किल्ले रामगड मोहिम श्रमदान मोहीम

आचरा –
दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवली होती. या मोहिमेत गडाच्या मुख्य दरवाज्याच्या देवडीजवळील भागातील अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक काढण्यात आला. या कामादरम्यान कित्येक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण प्रत्येक दुर्गवीरासाठी अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा होता. गडावर जाणाऱ्या अनेक वर्षांपासून विस्कळीत झालेल्या दगडी पायऱ्याही पुन्हा रचून त्यांना नवसंजीवनी देण्यात आली. प्रत्येक दगड आपल्या जागी बसवत असताना जणू इतिहासाला पुन्हा एकदा उभारी देण्याचे कार्यच सुरू होते.
या मोहिमेत मधुकर विचारे, लक्ष्मण घाडीगावकर, तुषार चव्हाण, मिलिंद चव्हाण, सुबोध चव्हाण, ओंकार पालव, प्रथमेश राणे, प्रणय चव्हाण, हार्दिक परब आदी दुर्गवीर उपस्थित होते. हे काम सुरू करण्यापूर्वी एक मोठी चिंता होती ती म्हणजे माती काढल्यानंतर तयार होणाऱ्या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी साचणार तर नाही ना? परंतु इतिहासाने पुन्हा एकदा आपली दूरदृष्टी दाखवली. कामादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेली इतिहासकालीन ड्रेनेज व्यवस्था सापडली. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा सुरळीत होणार असल्याची खात्री दुर्गविरांना मिळाली आणि हे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले. शेकडो वर्षांपूर्वी उभारलेली ती जलनियोजनाची कल्पकता आजही तितकीच सक्षम असल्याचे पाहून त्यांचे अभिमानाने भरून आले.
दुर्गवीर गेली अनेक वर्षे रामगडाच्या संवर्धनासाठी सातत्याने श्रमदान करत आहेत. या प्रवासात अनेक स्वप्ने मनात जपली आहेत. त्यापैकी एक स्वप्न आजच्या मोहिमेत पूर्णत्वाकडे जाताना पाहण्याचा आनंद प्रत्येक दुर्गवीराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. घामाचा प्रत्येक थेंब आज समाधानात रूपांतरित झाला होता. रामगडच्या संवर्धनाचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे असा विश्वास या दुर्गविरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here