दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवारांच्या १७ मागण्या
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवारांच्या १७ मागण्या
तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
मुंबई :
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १७ मागण्या केल्या आहेत. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक मदत आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवारांच्या १७ मागण्या
शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषीपंपांचे वीजबिल माफ करणे, दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य देणे, तसेच थेट आर्थिक मदत देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत, रोजगार हमीची कामे वाढवावीत, जलसंधारणासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक, वसतिगृह आणि मेस फी माफ करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
फळबाग आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याबरोबरच पशुधनासाठी थेट आर्थिक मदत देण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजुरांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि दसरा-दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.