दुष्काळी भागातील रोजगारासाठी ६,७२८ कोटींचा निधी; ३७५ प्रकारची कामे हाती घेणार
दुष्काळी भागातील रोजगारासाठी ६,७२८ कोटींचा निधी; ३७५ प्रकारची कामे हाती घेणार
मुंबई :
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि मजूर वर्गाला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाने ६,७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
या निधीतून ३७५ प्रकारची वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. रोजगारनिर्मितीसोबतच जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच कायमस्वरूपी मालमत्ता उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन, गायगोठे, फळबाग लागवड, बोअरवेल पुनर्भरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम उद्योगासाठी शेड आणि कंपोस्ट खड्ड्यांचा समावेश आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या कामांमध्ये तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, पाझर तलाव, माती बंधारे, शेत-पाणंद रस्ते आणि विविध जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.
विभागनिहाय निधीमध्ये अमरावती विभागासाठी १,१४५ कोटी, कोकण विभागासाठी ४८९ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १,९४४ कोटी, नागपूर विभागासाठी ११९ कोटी आणि पुणे विभागासाठी ८०१ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
या निधीत केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून दुष्काळी भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि आर्थिक आधार देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.