देवगड तालुक्यात ‘कट्टा’ हे नवीन महसुली गाव होणार; ३ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या
देवगड तालुक्यात ‘कट्टा’ हे नवीन महसुली गाव होणार; ३ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या
जामसंडे गावाचे विभाजन करण्याबाबत प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध; ५४ भूमापन क्रमांकांचा प्रस्तावित कट्टा गावात समावेश
देवगड प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुली कामकाजाचा निपटारा जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना प्रशासकीय सेवा मिळविणे अधिक सोयीचे व्हावे, या उद्देशाने देवगड तालुक्यातील जामसंडे या मोठ्या महसुली गावाचे विभाजन करून ‘कट्टा’ हे नवीन महसुली गाव निर्माण करण्याबाबत प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या प्रस्तावानुसार जामसंडे गावातील एकूण ५४ भूमापन क्रमांक वेगळे करून नवीन ‘कट्टा’ महसुली गाव निर्माण करण्यात येणार आहे. या प्रस्तावित विभाजनानंतर मूळ जामसंडे गाव आणि नवीन कट्टा गाव यांचे क्षेत्र भूमापन क्रमांकांनुसार स्वतंत्र करण्यात येईल.
जामसंडे गावात ४८५ भूमापन क्रमांक
प्रस्तावित विभाजनानंतर मूळ मौजे जामसंडे गावात एकूण ४८५ भूमापन क्रमांक राहतील. यामध्ये सर्वे क्रमांक १ ते ५६, ५८, ५९, ६६ ते १११, १५५ ते ५१६, ५१८ ते ५२७, ५३०, ५३१ आणि ५३३ ते ५३९ यांचा समावेश असेल.
कट्टा गावात ५४ भूमापन क्रमांकांचा समावेश
प्रस्तावित नवीन कट्टा महसुली गावात जामसंडे गावातील एकूण ५४ भूमापन क्रमांकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वे क्रमांक ५७, ६० ते ६५, ११२ ते १५४, ५१७, ५२८, ५२९ आणि ५३२ यांचा समावेश आहे.
३ नोव्हेंबरपर्यंत लेखी हरकती सादर करा
या प्रारूप अधिसूचनेमुळे ज्या नागरिकांवर किंवा हितसंबंधितांवर परिणाम होणार आहे, त्यांना आपली मते, हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी आपल्या लेखी हरकती व सूचना ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तहसीलदार, देवगड किंवा उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या कार्यालयात सादर कराव्यात.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्तावित गाव विभाजनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी दिलेल्या मुदतीत त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात.