दोन वर्षांत फुलणारा ‘वेलणकर सोनचाफा’ ठरला शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; सिंधुदुर्गच्या उदय वेलणकरांचा अभिनव प्रयोग
दोन वर्षांत फुलणारा ‘वेलणकर सोनचाफा’ ठरला शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; सिंधुदुर्गच्या उदय वेलणकरांचा अभिनव प्रयोग
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उदय वेलणकर यांनी विकसित केलेल्या ‘वेलणकर सोनचाफा’ या विशेष कलमाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक सोनचाफ्याच्या झाडांना फुले येण्यासाठी साधारणतः १० ते १२ वर्षे लागतात, मात्र वेलणकर यांनी विकसित केलेल्या या कलमांवर अवघ्या दोन वर्षांत फुले येण्यास सुरुवात होते, ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे.
कलमबांधणीच्या आधुनिक पद्धतीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ‘वेलणकर सोनचाफा’ची झाडे पुढील ३० ते ३५ वर्षे सातत्याने सुगंधी फुले देतात. त्यामुळे हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये सोनचाफ्याच्या फुलांना मोठी मागणी आहे. साधारणपणे १०० फुलांचा एक बॉक्स १०० रुपयांपर्यंत विकला जातो, तर सण-उत्सवांच्या काळात त्याची किंमत ५०० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे कमी क्षेत्रातही चांगले आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.
योग्य ऊन, पाणी, छाटणी आणि रोगनियंत्रण यांची काळजी घेतल्यास एका एकरातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. सिंधुदुर्गमधील काही शेतकरी दररोज १० ते ११ हजार फुले बाजारात पाठवत असल्याची माहिती मिळत आहे.
उदय वेलणकर यांनी केवळ स्वतःपुरते हे तंत्रज्ञान मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही कलमे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून ‘वेलणकर सोनचाफा’ची लोकप्रियता महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ आणि मध्यप्रदेशातही वाढली आहे.
शेतीत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांचा अवलंब केल्यास पारंपरिक पिकांमधूनही भरघोस उत्पन्न मिळवता येते, हे उदय वेलणकर यांनी आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.