नवगाव येथे भवानी माता मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
नवगाव येथे भवानी माता मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन; ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारली भव्य वास्तू
अलिबाग प्रतिनिधी :
अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे शिवज्योती मित्र व महिला मंडळाच्या पुढाकारातून भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
नवगाव येथील भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला भव्य आणि सुसज्ज स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांची एकजूट, शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे नियोजन, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि दानशूर व्यक्तींनी दिलेले योगदान यांच्या बळावर मंदिराची ही सुंदर वास्तू साकारण्यात आली. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून मंदिराचा जीर्णोद्धार
गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमात शिवज्योती मित्र व महिला मंडळाने पुढाकार घेतला. ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे मंदिराला नवे रूप प्राप्त झाले. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, उद्योजिका व दानशूर व्यक्तिमत्त्व कविता सिंह, एकविरा देवी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद घासे, आगरी माळी समाजाचे अध्यक्ष अरुण कवळे उपस्थित होते.
तसेच सरपंच अंकिता जैतू, उपसरपंच तथा शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे उपाध्यक्ष निखिल कवळे, मंडळाचे अध्यक्ष मधुकर घासे, सचिव समीर राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि अन्य मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.