नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; बेलापूर, नेरुळसह खारघर-कामोठे प्रभावित
नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; बेलापूर, नेरुळसह खारघर-कामोठे प्रभावित
नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाणीपुरवठा यंत्रणेतील विविध महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा तब्बल १६ तास बंद राहणार असून, नवी मुंबईतील अनेक विभागांसह सिडकोच्या खारघर व कामोठे नोडमधील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.
भोकर्पाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या संप चॅनेल व्हॉल्व्हसाठी एम.एस. प्लेट बसविणे, नवीन मीटरिंग किऑस्क बसविणे, तसेच भोकर्पाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळील २ हजार मि.मी. व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.
याशिवाय सीबीडी सेक्टर-९ येथे मोरबे मुख्य जलवाहिनीवर १२०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, वाशीतील अरेंजा सर्कलजवळ वितरण जलवाहिनीवर ९०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि महापे येथे वितरण जलवाहिनीवर ८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.
या कामांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या पाणीबंदीचा परिणाम बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागांवर होणार आहे. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
दरम्यान, बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या तसेच सायंकाळच्या वेळेत पाणीपुरवठ्याचा दाब कमी राहण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.