नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल
नवी मुंबई l प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज, रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत महापालिका सचिव श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांच्याकडे पार पडली.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी श्रीमती सरोज रोहिदास पाटील आणि श्रीमती सुजाता सुरज पाटील
यांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तर उपमहापौर पदासाठी श्री. आकाश बाळकृष्ण मढवी आणि श्री. दशरथ सिताराम भगत यांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत मतदान प्रक्रियेद्वारे महापौर व उपमहापौर पदासाठी निवड करण्यात येणार असून, या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडण्यात येणार असून, निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.


