निवडणूक काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नव्या LOI प्रक्रियेला स्थगिती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या काही कार्यवाहींविषयी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महामंडळाची बदनामी होऊन समाजात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने महामंडळाने अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व आर्थिक सहाय्याच्या प्रक्रिया या शासनाच्या मान्यतेनुसार आणि ठराविक आर्थिक अंदाजपत्रक व वार्षिक उद्दिष्टांनुसारच राबविल्या जातात. मात्र सध्या राज्यातील काही महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक प्रलंबित असलेल्या क्षेत्रांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून नवीन पात्रता प्रमाणपत्रे (LOI) देण्याची कार्यवाही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता उठल्यानंतर संबंधित कार्यवाही पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात येईल, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही महामंडळाने केले आहे.


