नेपाळमधील महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुखरूप सुटका

0
8
नेपाळमधील महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुखरूप सुटका
नेपाळमधील महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुखरूप सुटका

नेपाळमधील महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुखरूप सुटका

चीनची सीमा ओलांडून कोदारी इमिग्रेशन केंद्रातून नेपाळमध्ये प्रवेश; ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता

मुंबई :
नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश मिळत असून महाराष्ट्रातील आणखी ६९ नागरिकांनी रविवारी सायंकाळी उशिरा कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून चीनची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. प्राप्त माहितीनुसार, हे नागरिक ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
आपत्तीमध्ये अडकलेल्या राज्यातील ४०४ नागरिकांची नोंद राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे (SEOC) झाली आहे. त्यापैकी २६२ पर्यटक नागरिक अद्याप नेपाळ किंवा चीनमध्ये होते. आता आणखी ६९ नागरिकांना सुखरूप परत आणण्यात यश आले असून, यापूर्वी १४२ नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत मदत व बचावकार्याचे नियोजन करण्यात येत आहे. नेपाळ तसेच चीन आणि तिबेटमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (MEA) नियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागरिक आणि पर्यटक ज्या चीन, तिबेट व नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात गेले आहेत, त्यांची माहिती संबंधित यंत्रणांना पाठविण्यात येत आहे. त्यानुसार पूरग्रस्त विविध ठिकाणी आवश्यक बचाव पथके तैनात करून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण हे संपूर्ण कार्यवाहीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली असून, त्याद्वारे नातेवाईकांकडून आवश्यक माहिती घेतली जात आहे. तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबीयांशी २४ तास, सातही दिवस समन्वय साधला जात आहे.
नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचा हेल्पलाइन क्रमांक १०७० उपलब्ध आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here