पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

0
12
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

मान्यवरांकडून श्रद्धांजली, ‘शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपले’

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, सहकार क्षेत्रातील नेते तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवाचे कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वनमंत्री गणेश नाईक, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेत आदरांजली वाहिली.
यावेळी सर्वच मान्यवरांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षण, वैद्यकीय सेवा, कृषी, सहकार, क्रीडा आणि समाजकारणातील योगदान अधोरेखित करत त्यांना “ज्ञानाचा सागर”, “शिक्षण महर्षी” आणि “अजातशत्रू व्यक्तिमत्त्व” म्हणून गौरविले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र, सहकार, क्रीडा आणि कृषी अशा अनेक क्षेत्रांत भरीव कार्य केले. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राने एक ज्ञानसागर, लोकनेता आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी डॉ. पाटील यांच्याशी चार दशकांहून अधिक काळाचा स्नेह असल्याचे सांगत देश, महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जीवनाला संघर्षातून घडलेली यशोगाथा संबोधत शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचा उल्लेख करत त्यांना आधुनिक शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार म्हटले.
वनमंत्री गणेश नाईक, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, डॉ. विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, डॉ. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विविध मंत्री, आमदार, खासदार, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांनी दोन दिवसांत पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here