परिवहन विभागात १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या
परिवहन विभागात १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या
ई-वाहनांचेही लोकार्पण
मुंबई, दि. ३० : परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्या.
यावेळी परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पणही ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
परिवहन विभागात २०२२ पासून ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत असून, या प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला वाव मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे बदली व्यवस्थेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.