पाइप गॅस असलेल्या नागरिकांनी एलपीजी कनेक्शन परत करावे : केंद्र सरकारचा आदेश
नवी दिल्ली : घरगुती गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि अनुदानाचा योग्य लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) कनेक्शन असलेल्या नागरिकांनी घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवू नये, असा आदेश पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केला आहे.
मंत्रालयाच्या आदेशानुसार, ज्या व्यक्तींच्या घरात आधीच पाइपद्वारे नैसर्गिक गॅसचे कनेक्शन आहे, त्यांनी घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवणे किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून अथवा त्यांच्या अधिकृत वितरकांकडून एलपीजी सिलिंडरचे रिफिल घेणे टाळावे. अशा नागरिकांनी आपले घरगुती एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारच्या मते, देशभरात शहरांमध्ये पाइपद्वारे नैसर्गिक गॅसची सुविधा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एकाच घरात दोन प्रकारची गॅस सुविधा ठेवण्याची आवश्यकता नसून, यामुळे अनुदानित एलपीजीचा गैरवापर होण्याची शक्यता देखील निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर सरकारने पाइप गॅस सुविधा असलेल्या नागरिकांनी एलपीजी कनेक्शन परत करावे, असे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अधिक गरजू आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी संबंधित तेल कंपन्या आणि वितरकांच्या माध्यमातून करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.


