पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्ल्यात आसोली-रांजणवाडीत बंधारा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्ल्यात आसोली-रांजणवाडीत बंधारा
वेंगुर्ले : शुभम गवस :
पाणीटंचाईवर मात करण्यासह पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याच्या उद्देशाने आसोली-रांजणवाडी येथील वहाळावर ग्रामस्थांच्या पुढाकारातून बंधारा उभारण्यात आला. भाजपचे ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी एकत्र येऊन वहाळावर बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला.
वहाळातील पाणी अडवल्यामुळे परिसरातील विहिरी तसेच अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना देत स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
शासकीय यंत्रणांवर पूर्णपणे अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन जलसंधारणाचे काम हाती घेतल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यातही गावातील विविध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, या.का.का. सदस्य गुरुनाथ घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.