पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
ठाणे l प्रतिनिधी
ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन २०२६ – २७ च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना ६६० कोटी, आदिवासी उपयोजना १४० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १०७ कोटी अशा तरतुदींसह सुमारे १७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकाराची संवाद साधताना बोलत होते.
जिल्ह्यातील सर्व विकासकामे नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण झाली पाहिजेत आणि १०० टक्के निधी खर्च झाला पाहिजे. कोणताही विभागहलगर्जीपणा करत असल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्तेदुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी पॅचवर्क मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, नागरिकांना गैरसोय होऊ नये व अपघात टळावेत यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले. धोकादायक इमारतींना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारणे, निर्बीजीकरण आणि ॲनिमल ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहावी असे सांगण्यात आले तसेच सिव्हिल हॉस्पिटल लवकर सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.


