पिंगुळी तलावाचा ‘व्ह्यू’ की स्थानिकांच्या पाण्यावर घाव?
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक पिंगुळी तलावाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या आलिशान गृहप्रकल्पामुळे पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांच्या पाण्याच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘लेक फेसिंग’ या आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून तलावाच्या निसर्गरम्य दृश्याचे मार्केटिंग केले जात असताना, तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील संभाव्य हस्तक्षेपाबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पिंगुळीवासीयांनी उद्यापासून कुडाळ प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंगुळी तलाव हा केवळ पर्यटन किंवा निसर्गसौंदर्याचा विषय नसून स्थानिकांच्या जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा जलस्रोत आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात या तलावाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे तलावाच्या काठावरील प्रस्तावित बांधकामामुळे त्याच्या अस्तित्वावर किंवा पाणलोट क्षेत्रावर परिणाम होणार आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पर्यावरण विभागाकडे तक्रारी केल्याचे समजते. जिल्हा पाणथळ समितीने संबंधित बांधकामस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांनीही प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनीही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तलाव आणि परिसराची पाहणी केल्याची माहिती आहे.
मात्र, केवळ पाहणी करून प्रशासनाने हा विषय फाईलमध्ये बंद न ठेवता वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. पिंगुळी तलावाचे अधिकृत भू-वर्गीकरण काय आहे? तलावाच्या पाणलोट क्षेत्राची हद्द किती आहे? प्रस्तावित बांधकामासाठी कोणत्या परवानग्या देण्यात आल्या आहेत? राष्ट्रीय पाणथळ क्षेत्राच्या नोंदी आणि न्यायालयीन निर्देशांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या काही वर्षांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. भूजल पातळी खालावण्याची चिंता असताना नैसर्गिक जलस्रोतांच्या परिसरात वाढणाऱ्या बांधकामांबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज तलावाचा परिसर बांधकामासाठी खुला झाला आणि भविष्यात स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले, तर ही परिस्थिती दुर्दैवी ठरेल.
कोकणात विकास व्हावा, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होता कामा नये. बाहेरून येणाऱ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आलिशान घरे उपलब्ध व्हावीत आणि स्थानिकांना आपल्याच गावातील पाण्यासाठी संघर्ष करावा लागावा, अशी परिस्थिती निर्माण होणे ही विकासाची शोकांतिका ठरेल. संबंधित बांधकाम नियमबाह्य आहे किंवा नाही, याचा निर्णय आरोप-प्रत्यारोपांवर नव्हे, तर अधिकृत कागदपत्रे, परवानग्या आणि प्रत्यक्ष पंचनाम्याच्या आधारेच झाला पाहिजे.
पिंगुळीवासीयांच्या या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरण संरक्षण आणि पिंगुळी तलावाच्या संवर्धनाचा हा प्रश्न पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे हाताळण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्वमान्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने पिंगुळी तलावाची अधिकृत पाणथळ क्षेत्र म्हणून नोंद आहे का, प्रस्तावित बांधकाम तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येते का, बांधकामासाठी आवश्यक महसूल, ग्रामपंचायत आणि पर्यावरणविषयक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, तसेच जिल्हा पाणथळ समितीचा पंचनामा आणि अहवाल जनतेसाठी खुला केला जाणार का, असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परमपूज्य राऊळ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील पिंगुळी शहराच्या विकासाला खीळ न बसता पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण व्हावे, हीच अपेक्षा आहे. पिंगुळी तलावाचा निसर्गरम्य ‘व्ह्यू’ जाहिरातीत विकला जाईल; पण उद्या तलावाचेच अस्तित्व धोक्यात आले, तर त्या व्ह्यूचे काय आणि पिंगुळीकरांच्या पाण्याचे काय? हा प्रश्न आता प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.