पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्या
पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्या
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश; पुणे इनर रिंग रोड, मेट्रो, पूल, पाणी व पर्यावरण प्रकल्पांचा आढावा
पुणे :
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या पीएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या सविस्तर आढावा बैठकीत त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावे आणि सुमारे ५ हजार २१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुणे इनर रिंग रोड, सीएमपीअंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज आदी प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी औद्योगिक, धार्मिक, पर्यटन आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीचा विचार करून मल्टिमोडल हबचे एकात्मिक नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, माण–हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांच्या प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांना, अग्निशमन केंद्रांच्या जाळ्याला तसेच वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन नियोजनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
पुणे महानगर प्रदेशाचा विकास करताना वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.