पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर अपघाताचा परिणाम; एसटीच्या १३९ बस फेऱ्या रद्द
पुणे l प्रतिनिधी
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, या घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस सेवांवर झाला आहे. अपघातानंतर निर्माण झालेल्या अडचणींमुळे राज्यातील विविध मार्गांवरील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये ७३ ई-शिवनेरी बस फेऱ्या तसेच ६६ इतर प्रकारच्या बस फेऱ्यांचा समावेश आहे. अचानक निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वेळापत्रक कोलमडल्याने आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती.
त्यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा अपघातामुळे अडकलेल्या बसमधील प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
वाहतूक कोंडी निवळल्यानंतर आणि एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असेही परिवहन विभागाने कळविले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी बस सेवांबाबतची अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


