पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई; भिवंडीतून ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त
पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई; भिवंडीतून ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त
मुंबई/भिवंडी, प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर Food and Drug Administration Maharashtra ने मोठी कारवाई करत भिवंडीतील Rex International या कंपनीवर धाड टाकून ५,९२९ किलो मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे.
प्राथमिक तपासात विषारी दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे.
अवघ्या ३० रुपयांत विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमध्ये मिथेनॉल हे विषारी रसायन मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर FDA आयुक्त Tukaram Mundhe यांनी राज्यभर मिथेनॉलच्या अवैध साठ्यांविरोधात तातडीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० तसेच संबंधित कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले.
FDA ने नागरिकांना आवाहन केले आहे की, औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा अवैध साठवणूक, विक्री अथवा संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारीत नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संशयित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संबंधित पदार्थाची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी FDA कडून स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असून टोल-फ्री हेल्पलाईन सेवा देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त (औषधे) यांनी दिली.