पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक होणार प्रकाशित; १० लाखांची प्रशासकीय मान्यता
पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक होणार प्रकाशित; १० लाखांची प्रशासकीय मान्यता
मुंबई :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचा अमूल्य ठेवा आता पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चास १० लाख रुपयांपर्यंत प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २१ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला.
पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांतून मराठी रसिकांशी समृद्ध संवाद साधला. त्यांच्या पत्रव्यवहारात तत्कालीन साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता. शासन निर्णयात भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पं. रविशंकर, ग. दि. माडगूळकर, विंदा करंदीकर, जयवंत दळवी, विजय मर्चंट, बाबा आमटे, स्वामी विज्ञानानंद, पांडुरंगशास्त्री आठवले आणि दया पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाईंनी अनेक मान्यवरांची पत्रे जतन करून ठेवली होती. तसेच पु. ल. देशपांडे यांनी विविध मान्यवरांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रतीही सुनीताबाई आणि कुटुंबीयांच्या संग्रहात असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे. या पत्रव्यवहारातून त्या काळातील साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध होतात.
या पत्ररूपी सांस्कृतिक दस्तऐवजाचे संपादन करून पुस्तकाच्या रूपात प्रकाशन करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संचालकांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशनासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या उपक्रमासाठी होणारा खर्च पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संबंधित मंजूर तरतुदीतून भागविण्यात येणार आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशातील हा पत्रसंग्रह पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा संदर्भ ठरण्याची शक्यता आहे. पुस्तकाच्या प्रकाशनामुळे त्यांच्या समकालीन व्यक्तिमत्त्वांशी असलेल्या संवादाचे आणि त्या काळातील सांस्कृतिक वातावरणाचे अनेक पैलू अभ्यासक व रसिकांना उपलब्ध होणार आहेत.
शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा :- https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609211546306943.pdf