प्रधान सचिव एकनाथ डवले यांची अकोलेतील ‘उमेद’ उपक्रमांना भेट 

0
94
प्रधान सचिव एकनाथ डवले यांची अकोलेतील ‘उमेद’ उपक्रमांना भेट 
प्रधान सचिव एकनाथ डवले यांची अकोलेतील ‘उमेद’ उपक्रमांना भेट 

प्रधान सचिव एकनाथ डवले यांची अकोलेतील ‘उमेद’ उपक्रमांना भेट

 महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे केले विशेष कौतुक

अकोले l प्रतिनिधी :
राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी अकोले तालुक्यातील निसर्गरम्य भंडारदरा परिसरातील विविध गावांना भेट देत ‘उमेद’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांनी स्वबळावर उभारलेल्या उद्योगांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

डवले यांनी मुरशेत गावातील सुप्रसिद्ध सागवान बैलगाडी निर्मिती उपक्रमाला भेट दिली. यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘होम स्टे’ उपक्रम, मधाचे गाव, तसेच पर्यटकांसाठी उभारलेल्या ‘उमेद स्वाद कट्टा’ या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधत ‘लखपती दीदी’ योजना आणि होम स्टेच्या नव्या संकल्पनांबाबत मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान महिला बचत गटांच्या वतीने प्रधान सचिव एकनाथ डवले यांना सागवान बैलगाडीची प्रतिकृती, हातसडीचा तांदूळ आणि शुद्ध मध भेट म्हणून देण्यात आले. महिलांनी उभारलेल्या या उत्पादनांमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यानंतर त्यांनी शेंडी येथील ‘घोरपडा माता महिला समूहा’ने सुरू केलेल्या शिलाई प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. या समूहाद्वारे चालवण्यात येणारे लघुउद्योग आणि बोटिंग व्यवसाय पाहून महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. उमेद अभियानांतर्गत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या दौऱ्यात प्रधान सचिवांनी जनधन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलांचीही पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे का, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘उमेद’ अभियानामार्फत सुरू असलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून राज्यातील इतर भागांसाठी आदर्श ठरेल, असे मत प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. महिलांच्या सहभागातून गावांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याने अशा उपक्रमांना अधिक बळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here