सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (CFSD)च्या लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी : बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रामगिरी’ येथे करण्यात आले.
नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न तसेच त्याअनुषंगाने घेण्यात आलेले विविध निर्णय आणि या संपूर्ण प्रक्रियेचा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मात्र केवळ मालकी हक्काचे पट्टे देऊन सरकार थांबणार नसून, या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या लेखिका लीना बुद्धे यांनी झोपडपट्टीधारकांचे मालकी हक्क, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा गुंतागुंतीचा विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे.
नागपूरमधील मालकी हक्काच्या संपूर्ण प्रक्रियेचे या पुस्तकाच्या माध्यमातून दस्तावेजीकरण झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतल्याबद्दल त्यांनी लीना बुद्धे यांचे अभिनंदन केले.