औषध खरेदी आणि रुग्णसेवेबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा
बांदा, प्रतिनिधी
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध सुविधा आणि रुग्णसेवेतील त्रुटींवर आरोग्य समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तस्कर, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, माजी सरपंच बाळा आकेरकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
बैठकीत औषध खरेदीच्या प्रक्रियेवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक पुरवठादारांना डावलून बाहेरून औषधे खरेदी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे बिलांमध्ये वाढ होऊन शासनाचा नाहक भुर्दंड होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते.
यावेळी माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी रुग्णांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. रक्त तपासणीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला “खासगीमध्ये तपासणी करून घ्या” असे सांगितल्याची घटना त्यांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गर्भवती महिलांच्या कक्षात पुरेशी स्वच्छता ठेवली जात नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.
या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तस्कर यांनी चौकशी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य केंद्रातील स्वच्छता, औषध खरेदी प्रक्रिया आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील हजारो रुग्णांसाठी आधार आहे. त्यामुळे या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.