बांधकाम कामगार कल्याण मंडळात मोठा घोटाळा – राजू शेट्टी
कॅगच्या अहवालातून अनियमितता उघड
बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) यांच्या नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालात मंडळाच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले असून, यामुळे राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बांधकाम कामगार कल्याण मंडळातील संभाव्य घोटाळ्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करून माहिती देण्यात आली होती. मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. अखेर कॅगने मंडळाच्या कामकाजातील अनियमिततेबाबत ताशेरे ओढल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
कॅगच्या अहवालात निधीच्या वापरात अनियमितता, लाभार्थ्यांच्या निवडीत त्रुटी तसेच प्रशासकीय निष्काळजीपणा यांसारख्या बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या अनियमिततांमुळे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी असलेला निधी योग्य पद्धतीने वापरला गेला नसल्याचे चित्र समोर आले आहे.
राजू शेट्टी यांनी यापूर्वीही राज्यातील विविध घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केल्याचे सांगितले. यामध्ये साखर कारखाने विक्री घोटाळा, पीकविमा घोटाळा, आयटी घोटाळा, कारागृह घोटाळा, समृद्धी महामार्ग जमीन संपादन घोटाळा, कृषी विभागातील यांत्रिक उपकरण खरेदी घोटाळा तसेच महाडीबीटी घोटाळा यांचा समावेश आहे. मात्र यापैकी एकाही प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
अखेर कॅगच्या अहवालामुळे बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अनियमितता उघडकीस आली असून, यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला .


