‘बाळूमामांची भाकणूक २०२६’ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
कोल्हापूर : ‘बाळूमामांची भाकणूक २०२६’ या नावाने एक भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये देश-विदेशातील विविध घडामोडींविषयी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. या भाकणुकीमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल होत असलेल्या या भाकणुकीनुसार भारतातील मोठ्या नेत्यांवर हल्ल्याची शक्यता, तिसऱ्या महायुद्धाचा धोका, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काही काळ बंद राहण्याची शक्यता, तसेच महागाईत मोठी वाढ होण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वे आणि मोठ्या वाहनांच्या अपघातांबाबतही इशारा देण्यात आला आहे.
या भाकणुकीत कोल्हापूरातील देवीच्या डोळ्यांतून पाणी येण्याचा संकेत, सामाजिक नात्यांमध्ये बिघाड होण्याची शक्यता, तसेच जगभरात फसवणूक वाढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अगदी १२ वर्षांच्या मुली आई होण्याच्या घटना आणि भविष्यात माणूस पृथ्वी सोडेल, अशा टोकाच्या दाव्यांचाही यात समावेश आहे.
दरम्यान, या प्रकारच्या भाकणुकांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नसून तज्ञांनी नागरिकांना अशा संदेशांवर आंधळा विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अशा माहितीची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.


