बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव २६ जुलै रोजी!
बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव २६ जुलै रोजी!
मसुरे-प्रतिनिधी
निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आणि कोकणच्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे गावची ‘मूळमाया’ अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव २६ जुलै २०२६ रोजी साजरा होत आहे. आषाढ महिन्याच्या पवित्र दिवसांत, कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये होणारा हा जिल्ह्यातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव जत्रोत्सव असल्याने संपूर्ण सिंधुदुर्गात आणि भाविकांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
कोकणात मान्सूनचे रौद्र आणि देखणे रूप पाहायला मिळत असतानाच हा जत्रोत्सव येतो. मंदिराच्या चहूबाजूंनी पाणी, हिरवीगार सृष्टी आणि त्यातच जलमंदिरात विराजमान झालेली सातेरी देवी हे दृश्यच मनाला एक अलौकिक शांतता देऊन जाते. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्यामुळे मुंबईकर चाकरमानी, गोव्यासह इतर राज्यांतील देवीचे भक्त सर्व अडचणींवर मात करून माउलीच्या चरणी लीन होण्यासाठी बिळवसमध्ये दाखल होतात.
नवसाला पावणारी आणि संकटसमयी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी देवी अशी श्री देवी सातेरीची ख्याती केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर सातासमुद्रापार आहे. वर्षभरात मनात धरलेली सुप्त इच्छा, कुटुंबाच्या कल्याणासाठी मागितलेले मागणे पूर्ण झाल्यानंतर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविकांचा जनसागर या दिवशी बिळवस येथे उसळतो.
२६ जुलै रोजी पहाटेपासूनच जलमंदिराच्या परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी
सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात देवीचे विधीवत अभिषेक व पूजन केले जाईल.
पूजा संपन्न होताच भाविकांसाठी दर्शन खुले होईल. सुवासिनींकडून देवीची खणानारळाने ओटी भरणे, तसेच वर्षभरातील नवस फेडण्याच्या धार्मिक विधींना प्रारंभ होईल. दिवसभर चालणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची सांगता सायंकाळी पारंपरिक धार्मिक विधींनी होईल. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बिळवस गावामध्ये उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या हजारो भक्तांच्या सोयीसाठी आता जय्यत तयारी सुरू होणार आहे.
श्री सातेरी देवालय ट्रस्ट आणि समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, या पवित्र आषाढोत्सवात उपस्थित राहून सातेरी देवीचे दर्शन, ओटी भरणे व नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.