बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी ४ कोटी मंजूर

0
86
बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी ४ कोटी मंजूर
बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी ४ कोटी मंजूर

बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी ४ कोटी मंजूर

५२२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा दिलासा

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रलंबित प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, या कालव्याच्या बंदिस्त नलिका प्रणालीसाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार किरण (भैया) सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याने गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थांची प्रलंबित मागणी मार्गी लागली आहे.

बेर्डेवाडी प्रकल्पांतर्गत १०८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या ६ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याचे काम २०१६ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, कालवा अस्तरीकरणाशिवाय असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत होते. परिणामी, केवळ २ किलोमीटरपर्यंतच पाणी पोहोचत होते, तर झिरपणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतीचेही नुकसान होत होते.

यानंतर २०२५ मध्ये दुरुस्तीची कामे करून ५ किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आले, तरीही कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सुरळीत पाणी पोहोचण्यासाठी बंदिस्त नलिका प्रणाली आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. हीच समस्या वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

यावर तातडीने दखल घेत आमदार सामंत यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे येथील कार्यकारी संचालकांकडे या कामासाठी पत्रव्यवहार केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता ६ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निर्णयामुळे सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र थेट सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, उजव्या कालव्याबाबतही महत्त्वाची प्रगती झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे यांचा अहवाल प्राप्त झाला असून, विमोचकाची दुरुस्ती करून उजवा कालवाही बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पाचा अधिक व्यापक लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

बेर्डेवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला मिळालेला हा निधी म्हणजे केवळ एका कामास मंजुरी नसून, तो सिंचन व्यवस्थेला मिळालेली नवसंजीवनी मानला जात आहे. त्यामुळे वेरवली बुद्रुक आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here