भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच नागरिक गंभीर जखमी
वैभववाडी : तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून, सोमवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच नागरिक गंभीर जखमी झाले. जयवंती दत्ताराम पांचाळ (रा. ऐणारी), रघुनाथ भिकाजी मोहिते (रा. ऐणारी), संतोष बापू शेळके (रा. भुईबावडा), राजेंद्र रमेश पाथरे (रा. तिरवडे) आणि परशुराम राठोड (रा. भुईबावडा) अशी जखमींची नावे असून, यामध्ये दोन वयोवृद्धांचा समावेश आहे.
या घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यावर अचानक कुत्री आडवी येऊन अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन जखमी होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. तसेच पाळीव जनावरांनाही या कुत्र्यांकडून त्रास दिला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


