भाजप नेते संतोष कानडेंच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे सिंधुदुर्गात राजकीय खळबळ
कणकवली प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपमधील उमेदवारी निश्चिती अंतिम टप्प्यात असताना, कणकवलीतील भाजप नेते संतोष उर्फ बुवा कानडे यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. माजी तालुकाध्यक्ष, वृद्ध कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष आणि राणे कुटुंबाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कानडे यांनी आपल्या स्टेटसमध्ये “नितेश राणेंना रामराम, गोट्या सावंतांना सलाम!” असे स्पष्ट शब्द वापरल्याने पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर आला आहे.
कानडे हे कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. उमेदवारीबाबत पक्षाकडून शब्द देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र या जागेसाठी माजी सरपंच संतोष पारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या स्टेटसमधील गोट्या सावंत यांना दिलेला उल्लेख हा कणकवली तालुक्यातील तिकीट वाटपात काही नेत्यांना प्राधान्य दिले गेल्याचा अप्रत्यक्ष संकेत असल्याचे भाजपातील जाणकार सांगतात.
या एका स्टेटसमुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्व या अस्वस्थतेवर कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


