भिवबंदर-आघारी अणुऊर्जा, बॉक्साईट खाण व नवनगर प्रकल्पांविरोधात दापोलीत एल्गार
भिवबंदर-आघारी अणुऊर्जा, बॉक्साईट खाण व नवनगर प्रकल्पांविरोधात दापोलीत एल्गार
५ ऑक्टोबरला तहसीलदार कार्यालयावर धडक; प्रकल्प रद्द करण्याची मागणी
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यात प्रस्तावित असलेल्या भिवबंदर-आघारी अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव बॉक्साईट खाण आणि नवनगर विकास प्रकल्पांविरोधात स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या तिन्ही प्रकल्पांमुळे पर्यावरण, शेती-बागायती, समुद्रकिनारी परिसंस्था तसेच मच्छीमारांच्या पारंपरिक उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्थानिक नागरिकांचे हक्क, व्यवसाय आणि युवकांच्या रोजगाराच्या संधींवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या माहितीनुसार, सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दापोली तहसीलदार कार्यालयात संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.
या निवेदनातून प्रस्तावित प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या भूमिका आणि मागण्या शासन-प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत. विशेषतः पर्यावरण संवर्धन, शेतकरी व बागायतदारांचे हित, मच्छीमारांची उपजीविका, स्थानिक व्यवसाय आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
“हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून दापोलीच्या भवितव्याशी संबंधित आहे,” अशी भूमिका युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाने मांडली आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, व्यावसायिक, युवक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन बाळा खेडेकर यांनी केले आहे.
दरम्यान, या प्रस्तावित प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या चिंता, पर्यावरणीय परिणाम आणि शासनाची अधिकृत भूमिका याकडे आता दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.