मंकीपॉक्स या विषाणूजन्य रोगाच्या पहिल्या रुग्णाची नोंद गुरुवारी झाली आहे. केरळमध्ये रुग्ण नोंद झाल्यानंतर केरळमधील पाच जिल्ह्यांत राज्य सरकारने विशेष दक्षतेचा इशारा दिला आहे.मंकीपॉक्सचा रुग्ण ज्या शारजा- थिरुवनंतपूरम इंडिगो विमानातून आला, त्यातून प्रवास केलेल्यांत थिरुवनंतपूरम, कोलम, पथनमथित्ता, अलापूझा आणि कोट्टायम येथील लोकांचा समावेश आहे.हे विमान १२ जुलै रोजी थिरुवनंतपूरम येथे उतरले होते. त्यात १६४ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते.
राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी याबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.या विमानातून आलेल्या प्रवाशांनी स्वत: खबरदारी बाळगून २१ दिवसांच्या आत विषाणूची काही लक्षणे दिसल्यास आरोग्ययंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
▪️आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळावा. त्वचेशी आणि खाजगी भागांतील जखमा किंवा आजार असलेल्या व्यक्तीशीही संपर्क टाळावा.
▪️आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही जिवंत किंवा मृत सस्तन प्राण्यासोबत संपर्क टाळावा. यामध्ये उंदीर, खार, माकड या प्राण्यांसोबत संपर्क टाळावा.
▪️जंगली प्राण्यांचे मांस खाणं टाळा.
▪️कोणत्याही आजारी व्यक्तीच्या वापरातील वस्तू वापरू नका.