मंडणगडमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामे पूर्ण करावीत – राज्यमंत्री योगेश कदम
मंडणगडमधील पाणीपुरवठा योजनांना गती द्या; अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामे पूर्ण करावीत – राज्यमंत्री योगेश कदम
१४ नळपाणी योजनांचा आढावा; प्रलंबित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश
मंडणगड
मंडणगड येथे जलजीवन मिशन नळपाणी योजना व संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. केवळ कार्यालयात बसून कागदी काम न करता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी दिले.
तालुक्यातील १४ नळपाणी योजनांचा सविस्तर आढावा घेत ७५ ते १०० टक्के पूर्ण झालेल्या, मात्र किरकोळ तांत्रिक अडचणी किंवा महावितरणच्या जोडणीअभावी प्रलंबित असलेल्या योजना पुढील १४ ते १५ दिवसांत पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व १४ योजनांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
कमी पावसामुळे आगामी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. दुर्गम वाड्या-वस्त्यांसाठी लहान टँकरची मागणी नोंदवावी, स्वतंत्र टँकर खरेदीचा प्रस्ताव सादर करावा आणि शासकीय तसेच खासगी विहिरी-बोरवेलची पाणी तपासणी करून गरजेनुसार अधिग्रहणाचे नियोजन करावे, असे निर्देश दिले.
यासोबतच वनराई बंधाऱ्यांमुळे झालेल्या जलस्रोत बळकटीकरणाचा आढावा, नादुरुस्त बंधारे व पाण्याच्या चेंबर्सच्या दुरुस्तीचे टप्प्याटप्प्याने अंदाजपत्रक तयार करून कामे हाती घेण्याचे निर्देश दिले.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवालही सादर करण्याच्या सूचना केल्या. जनतेच्या पाणीप्रश्नांबाबत प्रशासनाने तत्परता, जबाबदारी आणि प्रत्यक्ष कृती दाखवली पाहिजे.
या बैठकीस रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिताताई केंद्रे, पंचायत समिती मंडणगडच्या सभापती सौ. प्रणालीताई चिले, उपसभापती श्री. दीपक मालुसरे, तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी श्री. राजेंद्र आंधळे यांच्यासह ग्रामसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.