दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथूरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक संभाजी सावंत यांच्या सेवानिवृत्ती समारंभासह मथूरभाई बुटाला आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांचे अनावरण उत्साहात पार पडले. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांनी, “या दोन्ही पुतळ्यांच्या उभारणीत सर्वात मोलाचे योगदान संभाजी सावंत सरांचे आहे,” असे गौरवोद्गार काढले.
श्रीराम साळुंखे म्हणाले, “बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्धार केला, तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. मात्र मथूरभाई बुटाला यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींनी त्यांना खंबीर साथ दिली. त्यामुळेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शैक्षणिक जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारले. आज मथूरभाई बुटाला यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने त्यांच्या त्यागाची योग्य दखल घेण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा अभिमान वाटत असेल. आज मुख्यमंत्री कार्यालयातील पीए देखील बापूजींचे विद्यार्थी आहेत, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेसाठी आणि समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे.”
सेवानिवृत्तीप्रसंगी उत्तर देताना संभाजी सावंत म्हणाले, “३४ वर्षांच्या सेवाकाळातील बहुतांश काळ गावतळे येथेच गेला. या काळात मला सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे सातत्याने सहकार्य लाभले. मी सर्वांचा ऋणी आहे.”
शाळेच्या प्राचार्या भक्ती सावंत यांनी सावंत सरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक योगदानाचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात एन. वाय. पवार यांनी सांगितले की, “सावंत सरांनी या शाळेसाठी स्वतःच्या खिशातून सुमारे पाच लाख रुपयांचे योगदान दिले. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.”
कार्यक्रमात संभाजी सावंत यांच्या पत्नी सपना सावंत, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, माजी सभापती प्रकाश कालेकर, भरत दाभोळकर, दीपक देवरुखकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक पी. एस. चव्हाण, हुसेन पठाण, मथूरभाई बुटाला यांच्या पत्नी लीलावती बुटाला, कन्या डॉ. सुजाता मयेकर, प्राचार्य भागवत देसाई, स्वामी सर, अरुण सिदनाईक, गावतळे सरपंच विधी पवार, पोलीस पाटील विशाल म्हाब्दी, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पवार, उत्तम पवार, संदीप मांडवकर, विठाताई कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या भक्ती सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन एन. एल. कालेकर यांनी केले.