मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावे; शासन खंबीरपणे पाठीशी – उदय सामंत

0
5
मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावे; शासन खंबीरपणे पाठीशी – उदय सामंत
मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावे; शासन खंबीरपणे पाठीशी – उदय सामंत

मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावे; शासन खंबीरपणे पाठीशी – उदय सामंत

मोशी येथे ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे उद्घाटन; तरुण व महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही

पुणे :
मराठी माणसाने केवळ नोकरी मागणारा न राहता नोकरी देणारा उद्योजक बनावे. मराठी उद्योजकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून, उद्योग उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’च्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, बीव्हीजी समूहाचे प्रमुख हनुमंतराव गायकवाड, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, आंतरराष्ट्रीय मराठा उद्योजक संघाचे अध्यक्ष संजय वायाळ, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि उद्योजक उपस्थित होते.
मराठी उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि नावीन्यपूर्ण कल्पनांच्या बळावर जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. हनुमंतराव गायकवाड, गणेश निबे आणि भरत गीते यांसारख्या उद्योजकांचा संघर्ष आणि यश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवसायाच्या क्षेत्रात मराठी माणूस कुठेही मागे नाही, हा आत्मविश्वास प्रत्येकाने जपला पाहिजे, असेही ते म्हणाले.
तरुण आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. उद्योजकांना आवश्यक मार्गदर्शन, बँकांचे सहकार्य, शासकीय यंत्रणेची मदत आणि उद्योगपूरक धोरणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी उद्योजकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, नवीन उद्योग उभारावेत, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात उंचवावे. उद्योजकांच्या प्रगतीसाठी शासन त्यांच्या दारी येईल, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी या निमित्ताने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here