महायुतीतले झारीतील शुक्राचार्य कोण ? रविंद्र चव्हाणांनी पुन्हा डिवचलं
ठाणे :
महायुतीतले झारीतील शुक्राचार्य कोण ? याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी विचार करावा, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल्याने महायुतीतील संघर्ष अजूनही संपला नसल्याचे स्पष्ट होते. भारतीय जनता पक्षाचा विकास पाहून लोक पक्षात येतात, येतच राहणार आहेत, असेही फोडोफाडीच्या चर्चांवर रवींद्र चव्हाण म्हणाले.
ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील पक्षप्रवेशावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यांच्यातील संघर्षामुळे महायुतीत देखील तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूज १८ लोकमतने रविंद्र चव्हाण यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी महायुतीतील झारीचे शुक्राचार्य कोण आहेत याचा सेनेच्या नेतृत्वाने शोध घ्यावा, असे विचार करायला लावणारे वक्तव्य केले.


