महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार; मंत्री नितेश राणे यांची ICAR-CIFE सोबत आढावा बैठक

0
5
मंत्री नितेश राणे यांची ICAR-CIFE सोबत आढावा बैठक
मंत्री नितेश राणे यांची ICAR-CIFE सोबत आढावा बैठक

महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार; मंत्री नितेश राणे यांची ICAR-CIFE सोबत आढावा बैठक

ॲक्वाकल्चर क्षेत्राच्या शाश्वत विकासावर भर; मच्छीमारांना परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे निर्देश

मुंबई :
राज्यातील ॲक्वाकल्चर अर्थात जलकृषी क्षेत्राचा शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उद्योजकता-केंद्रित विकास साधण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात ICAR-CIFE, मुंबई येथील संचालक आणि शास्त्रज्ञांसमवेत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनक्षमता वाढविण्यासह मच्छीमारांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीत मत्स्यबीज केंद्रांचे आधुनिकीकरण आणि मानांकन, क्षारयुक्त पाण्यातील मत्स्यपालन, कोकणातील समुद्री शैवाल लागवड, मत्स्यखाद्य तंत्रज्ञान, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन तसेच प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर शास्त्रज्ञांनी सादरीकरणही केले.
महाराष्ट्रातील मच्छीमारांना परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मच्छीमारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या कौशल्यात वाढ होईल, असे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी संबंधित विभाग आणि संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या उपक्रमाच्या माध्यमातून मच्छीमारांचे कौशल्य विकसित करणे, मत्स्य उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादनक्षमता सुधारणे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हे उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीला मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे प्रकाश खपले तसेच ICAR-CIFE चे अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here