
महाराष्ट्रातील मत्स्यशेती विकासासाठी कृती आराखडा; मंत्रालयात नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्यशेती क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी तसेच राज्यातील संभाव्य मत्स्यशेती क्षेत्रांची अचूक माहिती उपलब्ध करून देणाऱ्या “महाराष्ट्रातील संभाव्य मत्स्यशेती क्षेत्रांचा अॅटलस” (Atlas on Potential Aquaculture Zones in Maharashtra) या महत्त्वपूर्ण प्रकाशनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भूषविले.

बैठकीत अॅटलसमधील निष्कर्षांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यात मत्स्यशेतीसाठी उपलब्ध असलेल्या संभाव्य क्षेत्रांची ओळख, मत्स्य उत्पादन वाढीच्या संधी, पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील मत्स्यशेती क्षेत्राच्या विकासासाठी निश्चित कालमर्यादेत कृती आराखडा राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि मत्स्यशेतीशी निगडित समुदायांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच राज्याच्या ब्लू इकॉनॉमीला अधिक बळकटी देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी तसेच ICAR-CIBA चे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

