‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’मुळे उद्योजकता व निर्यातवाढीस चालना – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’च्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योजकता आणि निर्यातवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी व्यक्त केला. शहरातील हॉटेल यश ग्रँड येथे आयोजित या कन्व्हेन्शनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी, महाव्यवस्थापक दीपक शिवदास, जयद्रत खताळ, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा, अरुण खामेरे, उद्योग अधिकारी अशोक बेनके, श्याम बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
दादासाहेब गिते म्हणाले की, जागतिकीकरणाच्या आणि सतत बदलत्या आर्थिक परिस्थितीत उद्योजकता व निर्यातक्षम उत्पादन हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग, स्टार्टअप आणि निर्यात प्रोत्साहन योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच निर्यातीतही लक्षणीय वाढ साधता येईल. कृषीपूरक उद्योग, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादनांमधून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाकडून उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, सुलभीकरण आणि मार्गदर्शनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग धोरण व सद्यस्थितीवर मार्गदर्शन करताना सहसंचालक वृषाली सोने म्हणाल्या की, उद्योजकांना निर्यात प्रक्रियेची माहिती, संधी आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सक्षम उद्योजक वर्ग असल्याने निर्यातवाढीस मोठा वाव आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी साखर व दुग्धजन्य उत्पादने निश्चित करण्यात आली असून, सध्या सुमारे १ हजार ४७९ कोटी रुपयांची निर्यात होत असल्याची माहिती त्यांनी दिली. पॅकेजिंग, ब्रँडिंग, गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन यावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी यांनी सेवा क्षेत्रातील निर्यातीच्या संधींवर प्रकाश टाकत माहिती तंत्रज्ञान, हेल्थकेअर, शिक्षण, पर्यटन, लॉजिस्टिक्स, डिझाइन व कन्सल्टन्सी यांसारख्या क्षेत्रांत जिल्ह्यात मोठी क्षमता असल्याचे सांगितले. सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांना नोंदणी, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाव्यवस्थापक दीपक शिवदास यांनी कन्व्हेन्शन आयोजनामागील भूमिका मांडली. दुपारच्या सत्रात ‘मैत्री व ईज ऑफ डुइंग बिझनेस’, डीजीएफटीची भूमिका, विविध अनुदान योजना, डाक निर्यात केंद्र, विमा, एसआयडीबीआय योजना आणि शासनाच्या निर्यात धोरणावर तज्ज्ञांनी सादरीकरण व मार्गदर्शन केले. संगमनेर येथील उद्योजक रणजीत वर्पे यांनी निर्यातीतील अनुभव कथन केला.
या कन्व्हेन्शनला जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, नवउद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी, वित्तीय संस्था व विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


